सध्या, सोशल मीडिया वर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेलं एक माध्यम म्हणजे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग.’ यालाच मराठीत ‘थेट प्रक्षेपण’ असे म्हटले जाते. आपण एरवी जे टीव्ही वरील किंवा नेटवरील कार्यक्रम बघतो, ते आधी रेकॉर्ड/ शूट केलेले असतात. आपल्यापर्यंत येण्यापूर्वी ते हवे तसे एडिट केलेले असतात. पण, थेट प्रक्षेपणात असे होत नाही. ज्या वेळी ते रेकॉर्ड होत असतात, त्याचवेळी आपल्याला ते वाहिन्यांद्वारे तसेच्या तसे दाखवले जातात. म्हणूनच याला ‘थेट’(लाईव्ह) प्रक्षेपण म्हटले जाते.
सोशल मीडिया वरील लाईव्ह स्ट्रीमिंग बर्याचदा प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी केले जाते. इंटरनेट वर जगातील सर्व लोक एकमेकांशी जोडू शकतात, आणि ह्याच माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याने आपला प्रेक्षक वर्ग खूप जास्त प्रमाणावर वाढू शकतो. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर लोकांना आकर्षित करून घेण्यास अतिशय उपयुक्त आहे. यामुळे views वाढण्यास खूप मदत होते. कारण याद्वारे, आपल्या ऑडियन्ससोबत थेट संवाद केला जातो. त्यांच्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे तात्काळ देणे आपल्यास शक्य असते. कुणीही लाईव्ह स्ट्रीमिंग चालू केले, की त्यांच्या कॉनटॅक्ट्स मधील सर्वांना नोटिफिकेशन जाते, ते पाहून लोक उत्सुकतेने उघडून पाहतात. तसे लाईव्ह हे सगळ्यांसाठीच खुले असल्याने, आणखीही लोक जोडले जाण्यास मदत होते. आपल्या चॅनल किंवा कोणत्याही कामाच्या प्रचारासाठी अनेक जण थेट प्रक्षेपण पद्धतीचा अवलंब करतात. तसेच, लाईव्ह स्ट्रीमिंग ही पद्धत फार खर्चिक नसल्यामुळे ती अनेकांना जास्त परवडते. यात आधीच्या रेकोर्डिंग्ज, एडिटिंग इत्यादींचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाचतात. काही कंपन्या त्यांच्या नव्या कर्मचार्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स चा भाग म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंग वापरतात.
लाईव्ह स्ट्रीमिंगचा उपयोग अनेक बिझनेसमन त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी करून घेतात. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे वेबिनार्स, मुलाखती, इत्यादींचा उपयोग करून आपल्या व्यवसायास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. लोकांशी थेट संबंध प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने आपल्या व्यवसायाचा प्रचार करणे सोपे होते. आपल्या प्रोडक्टस बद्दल लाईव्ह स्ट्रीमिंग मधून आपण व्यवस्थित माहिती देऊ शकतो, तसेच, प्रेक्षक त्यांच्या शंका लगेचच विचारू शकतात. अश्या रीतीने एकमेकांशी संवाद होत असल्याने लोक लाईव्ह मध्ये गुंतून राहतात. तसेच, लाईव्ह मध्ये व्हिडिओ मधील व्यक्ती लोकांच्या स्तरावर येऊन त्यांच्याशी गप्पा मारत असल्यामुळे, तेही त्या व्यक्तिसोबत आरामात संवाद साधू शकतात. यामुळे, व्हिडिओ मधील बिझनेसमन आणि त्याचे ग्राहक यांच्यात एक प्रकारे आपुलकीचे नाते निर्माण होते, जे व्यवसायास प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. अश्या रीतीने कमी खर्चात व वेळात आपल्या व्यवसायाचा प्रचार करणे ह्या लाईव्ह स्ट्रीमिंग ने शक्य होते. Branded site, Vimeo, LinkedIn live, हे काही व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचे प्लॅटफॉर्म्झ आहेत.